Friday, April 20, 2018

मुलाखत क्रमांक १


 मराठी उद्योजकांची मुलाखत ||  Marathi Businessman  ||  महाराष्ट्रातील उद्योग

नमस्कार महाराष्ट्र!
#उद्योजकमहाराष्ट्र ही संकल्पना राबवताना अनेक उपक्रम घ्यायचे असं ठरलं आहे. त्यातील एक उपक्रम आज सुरू करत आहोत. ट्विटरवरील जे उद्योजक आहेत त्यांची मुलाखत घेऊन त्यांचा उद्योग/व्यवसाय अन त्याबाबतीत आलेले अनुभव आपण जाणून घेणार आहोत. 

हे अनुभव अनेकांना उपयोगी अशी अपेक्षा करतो अन हा उपक्रम सुरू करतो! या मुलाखतीत आपण सुरुवातीला पाहुण्यांशी संवाद साधूया अन त्यानंतर ज्यांना प्रश्न असतील, शंका असतील त्यांनी त्या विचाराव्यात!

#उद्योजकमहाराष्ट्र
नमस्कार, आज आपल्यासोबत आहे मराठी ट्विटरविश्वातील सुपरिचित चेहरा हेमंत आठल्ये | @hemantathalye मराठी ट्विटरकर हेमंतना वेगवेगळ्या भूमिकेतून भेटत असतात. विविध उपक्रम, विषय ठामपणे मांडण्यात त्यांची वेगळी ओळख नेहमीच दिसून येते. पण आज आपण हेमंत यांना आपण एक उद्योजक म्हणून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला, सुरू करुयात या संवादाला!

प्रश्न१
@hemantathalye तुमचं #उद्योजकमहाराष्ट्र या उपक्रमात स्वागत. आमच्या मंचावरील तुम्ही पहिले पाहुणे. सर्वात आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मूळ कुठचे? आता कुठे असता?
हेमंत यांचं उत्तर
मला आपण संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो! मी मूळचा नगर जिल्ह्यातला. वांबोरी नावाचं गाव आहे. गेली दहा वर्षांपासून पुण्यात असतो!

प्रश्न २ 
तुमचं शिक्षण कुठे झालं अन कोणत्या शाखेत झालं? आणि पुण्यात येण्याचं कारण काय?
हेमंत यांचं उत्तर
शिक्षण फार नाही. बारावी नंतर दोन वर्षाचा डिप्लोमा केलेला. नंतर नोकरी! नोकरी हेच येण्याचं कारण!

अच्छा,तर रोजगाराच्या निमित्ताने पुण्यात येणं झालं. Ok.
प्रश्न ३ 
शिक्षणानंतर डिप्लोमा वगळता अजून कुठला विशेष कोर्स वगैरे केला आहे का? आणि डिप्लोमा कुठे केला?
हेमंत यांचं उत्तर
वेब डिझायनिंगचा दोन वर्षाचा कोर्स केलेला. त्यावेळी हे क्षेत्र फारसे कुणाला माहित नव्हते. व माझाही फारसा काही विचार मनात नव्हता. बीएससी ऍग्री अथवा बीए संस्कृत करावी अशी घरच्यांची इच्छा होती. पण आमची गाडी डिझायनिंगमध्ये रुळली

प्रश्न ४
मग शिक्षणानंतर थेट व्यवसाय सुरू केला की नोकरी केली?
हेमंत यांचं उत्तर
नऊ वर्षे नोकरी केली. नंतर व्यवसायात शिरलो!

प्रश्न ५
नऊ वर्षे नोकरी म्हणजे मोठा अनुभव! नोकरीचा एकंदरीत अनुभव कसा होता? नोकरी करताना व्यवसाय करायचा विचार डोक्यात कसा आला? की तो आधीपासूनच होता?
हेमंत यांचं उत्तर
चांगला अनुभव होता. नोकरी हाही एक व्यवसायाचं आहे! फरक इतकाच यात तुमच्या काही हातात नसत आणि असुरक्षितता अधिक. नोकरी करत असतांना बंधन फार असायची! अगदी छोट्या मोठ्या गोष्टीतही परवानग्या! त्यामुळे पुढे जाऊन स्वतः उद्योगात उतरायचे हे मत बनत गेले

प्रश्न ६
म्हणजे नोकरी करण्यापूर्वी व्यवसायाचा कसलाही विचार तुमच्या डोक्यात नव्हता? नोकरीचा अनुभव घेतल्याच्या नंतर व्यवसाय हा तुम्हाला करियरसाठी योग्य मार्ग वाटू लागला असं म्हणता येईल का?
हेमंत यांचं उत्तर
हो! म्हणजे असं काही ठरलेलं नव्हतं! जसजसे अनुभव आले तसं घुसमट व्हायची. पोटभर पगार पण स्वातंत्र्य नाही. काम कमी आणि इतर लफडी जास्त असं झालेलं. गेमाडपंथी सिनिअर आणि त्याचे पॉलिटिक्स! विटलो होतो!

प्रश्न ७
मग तो क्षण कोणता होता जेंव्हा आर पारचा निर्णय घेतला आणि आता व्यवसाय करायचाचहा विचार पक्का झाला? काही घटना किंवा ट्रिगर ? अन त्यावेळेस भावना काय होती?
हेमंत यांचं उत्तर
एका ठराविक काळानंतर जेंव्हा सकाळी तुम्हाला उठल्यावर कंपनीचा विचार आला की निराश वाटू लागत तेंव्हा समजून जा की तुमचा त्या कंपनीतील रस संपला आहे. शेवटच्या कंपनीत तेच तेच काम आणि शिकण्यासारखं काही नाही. तेव्हा ठरवलेलं! एकदा प्रयत्न करून पाहुयात!

प्रश्न ८
चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय सुरू करताना सर्वात महत्वाची गोष्ट असते कुटुंबियांची प्रतिक्रिया! घरच्या मंडळींकडून या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया काय आली?
हेमंत यांचं उत्तर
उत्तर अपेक्षित जे होत तेच मिळालं. महिन्याकाठी लाखभराच्या जवळ जाणारा पगार सोडून व्यवसाय तेही कोणतीही ओळख नसतांना! घरच्यांना सगळंच न पटणारं होत!
उपप्रश्न
येथे जाणून घ्यायला आवडेल की, त्यावर तुमची कसे व्यक्त झालात? कुटुंबीयांना कसं समजावलं?
उत्तर
अजूनही अनेकांना माझा हा निर्णय पटलेला नाही. कारण एकच की कुटुंबातील काही जणांनी प्रयत्न केले व ते अयशस्वी झाले. त्यांची भीती ही होती की अपयश आलं तर पुढे काय? माझं म्हणणं असं होत की एका व्यवसायात अपयशी झालो तर दुसऱ्या व्यवसायात शिरेन!

व्वा! तुमच्या धाडसाचं कौतुक! हा आत्मविश्वास व्यवसायात महत्वाचा असतो. पुढे जाऊयात...
प्रश्न ९ 
व्यवसाय सुरू करताना मनात कुठे दडपण किंवा भीती होती का, की आपण आता एका सुरक्षित कवचातून बाहेर पडत आहोत अन संघर्षाचा काळ येणार आहे?
हेमंत यांचं उत्तर
खरं सांगू का, माझ्या मित्रांनी व वडिलांनी त्या काळात मला धीर दिलेला. सोबत संतांचे विचारांनी मनःशांती तर मिळायची सोबत नवी ताकदही मिळायची! मनावर ताबा ठेवला तर यश नक्की मिळते!
उपप्रश्न
थोडसं वैयक्तिक प्रश्न आहे, पण अत्यंत महत्वाचा... ज्यावेळेस तुम्ही हा निर्णय घेतला तेंव्हा तुमच्यावर कुटुंबातील जबाबदारी कितपत होती? घर पूर्णतः तुमच्या पगारावर अवलंबून होतं?
उत्तर
हो! त्यावेळी दोन मुली! घराचं लोन! थोडक्यात सगळ्याच जबाबदाऱ्या होत्या! कमावता एकच व्यक्ती! त्यामुळे निर्णय अधिकच गंभीर होता. परंतु हा निर्णय कधी ना कधी घ्यावा लागणार होता. वयाच्या पन्नाशीत निर्णय घेण्यापेक्षा तिशीत घेतला तर वीस वर्षांचा फायदा!

प्रश्न १०
मग त्या काळात स्वतःला काय सांगत होता? डोक्यात, मनात नेमका काय विचार चालू होता? कुटुंबियांसाठी खासकरून...?
हेमंत यांचं उत्तर
घरात साधारण दीड एक वर्ष तंग वातावरण होत! चिमुरड्याच काय त्या जमेच्या बाजू. चिमुरड्यांना पाहिलं की ताण कमी व्हायचा! घरातून अपेक्षेप्रमाणे विरोध जसा होता. तसाच कामात अपेक्षेप्रमाणे पाठिंबा! यश जेव्हा मोठ्या प्रमाणात मिळेल तेव्हा वातावरण निवळेलं!

प्रश्न ११
आता मूळ विषयाकडे येऊयात. कोणता व्यवसाय करायचा अन कुठे करायचा हे कसं निश्चित केलं?
हेमंत यांचं उत्तर
माझ्यासाठी सर्वात सोपा व्यवसाय म्हणजे वेब डिझायनिंगच होता. नऊ वर्षे तेच करत आलेलो. त्यामुळे तेच करायचं ठरवलेलं. मी जे काम करतो त्यासाठी हे विश्वची माझे ग्राहक असा प्रकार आहे आणि अनेक फ्रीलान्सिंगच्या वेबसाईटस! त्यामुळे सुरवात होऊ शकली!

प्रश्न १२
कुठलाही व्यवसाय सुरू करताना भांडवलहा कळीचा मुद्दा असतो, त्याबाबतीत काय केलं? म्हणजे, ती सगळी जुळवाजुळव कशी केलीत?
हेमंत यांचं उत्तर
पैसे नव्हते पण लॅपटॉप होता. नेट महाराजांनी फार मदत केली! भांडवल म्हणजे पैसे वगैरे नव्हते. जे होते ते घर खर्चासाठी वापरावे लागणार होते. नेटपॅक आणि लॅपटॉप हेच काय ते भांडवल. सुरवातीला ओळखीच्या लोकांना भेटून कामाची माहिती देत होतो. त्यातून काही कामे मिळाली

प्रश्न १३
म्हणजे, तुम्ही जो व्यवसाय करू इच्छित होता तोच व्यवसाय सुरू करायला xyz लाख इतकं भांडवल आवश्यक असतं का? आणि सुरुवातीला एकटेच काम करत होता का?
हेमंत यांचं उत्तर
खरं तर हे व्यवसायावर अवलंबून असत. मी माझा व्यवसाय छोट्या पद्धतीने सुरु केला. सुरवात घरातून केलेली. नंतर ग्राहकांच्या सुविधेसाठी आता घराच्याऐवजी दुसऱ्या जागी बसून व्यवसाय करतोय. इच्छाशक्ती महत्वाची! एकटाच आहे पण लागेल तशी मदत घेतो!
उपप्रश्न
म्हणजे कमीत कमी साधनात अन केवळ स्वतःच्या कामावर या क्षेत्रात व्यवसायला सुरुवात करता येते. त्यासाठी विशिष्ट भांडवल, ऑफिस अन इतर पसारा आवश्यक असतोच असं काही नाही.
उत्तर
100%  ग्राहकाला काम योग्य होणं हे अधिक महत्वाचं!

बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे वळू...
प्रश्न १४
सध्या ऑफिसमध्ये किती मनुष्यबळ आहे? कोणकोणती साधने आहेत? काय-काय मशीन्स असतात यात?
हेमंत यांचं उत्तर
इथं वन मॅन आर्मी आहे. लवकरच अजून काही संलग्न गोष्टी सुरु करेन. त्यात मनुष्यबळाची आवश्यकता भासेल. तशी व्यवस्था मी तयार करतो आहे. साधने म्हणशील तर एक डेस्कटॉप, एक टॅब, दोन-तीन मोबाईल व नेट असं आहे. बाकी सोशल मीडियावर फोकस!

संवाद
आम्ही तुमची मुलाखत घेत आहोत, नोकरी देताना तुम्ही आमची मुलाखत घ्याल अशी अपेक्षा करतो... गमतीचा भाग... :-}
प्रश्न १५
तुम्ही आता कोणकोणत्या सेवा देऊ करता? म्हणजे तुमची कंपनी कोणकोणत्या services provide करते?
हेमंत यांचं उत्तर
वर्तमानात वेब साईट डिझायनिंग/मेंटेनंस करतो. डिजिटल मार्केटिंगमध्ये लवकरच उतरत आहे. तशी व्यवस्था निर्माण करतो आहे

प्रश्न १६
या सर्व सेवा पुरवताना ग्राहक तुमच्यापर्यन्त येईल यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागतात? म्हणजे just dial वर listing सारख्या गोष्टी? कंपांनीच्या जाहिरातीबद्दल जाणून घेऊ.
हेमंत यांचं उत्तर
दोन पद्धती वापरतो. एक म्हणजे सोशल मीडिया! आणि दुसरे म्हणजे प्रत्यक्ष भेटी. अनेकजण प्रत्यक्ष भेटीवर जास्त भर देतात! जस्ट डायल वगैरे अजून तरी वापरले नाही. फक्त प्रोफाइल केलेली आहे!

प्रश्न १७
नेमके कशा प्रकारचे ग्राहक अपेक्षित असतात या व्यवसायात; अन कोणत्या प्रकारचे ग्राहक तुमच्याकडे येतात?
हेमंत यांचं उत्तर
नवीन व्यवसाय सुरु केलेल्यांना वेबसाईटची आवश्यकता असते. अनेकदा व्यवसायाची ब्रॅण्डिंग करणे देखील आवश्यक असते त्यामुळे प्रस्थापित व्यावसायिकही ग्राहक म्हणून येतात!

प्रश्न १८
सध्या तुम्ही कोणकोणत्या शहरांत सेवा देऊ करता?
हेमंत यांचं उत्तर
माझा व्यवसाय ऑनलाईन आहे. त्यामुळे भूगोलाचे बंधन नाही. काही परदेशी ग्राहकही आहेत.

प्रश्न १९
व्यवसायात सर्वात महत्वाचा भाग आहे नफ्याचा! हे गणित कसं असतं? म्हणजे कोणत्या सेवेत सर्वाधिक नफा असतो? किंवा मार्जिन किती असतं हे विचारणे रास्त ठरेल!
हेमंत यांचं उत्तर
मी अनेकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु याच गणित प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कामाचा वेळ व कामाची काठिन्यता यावर मी कामाचे मूल्य ठरवतो. कोणताही व्यवसाय नफ्यातच असतो. फक्त नफा कमी जास्त असतो.

प्रश्न २०
या व्यवसायाला जोडून समांतर असा दूसरा व्यवसाय करता येणे शक्य आहे का? असेल तर तो कोणता असू शकतो असं तुम्हाला वाटतं?
हेमंत यांचं उत्तर
हो शक्य आहे! एकच काय अनेक केले जाऊ शकतात. सध्याला मी डिजिटल मार्केटिंगच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून काम करीत आहे! पुढे जाऊन इन्स्टिट्यूट टाकण्याचा विचार आहे.

मस्त! त्यासाठी शुभेच्छा!
प्रश्न २१
नोकरी सांभाळून ह्या व्यवसायाला सुरुवात करता येईल का?
हेमंत यांचं उत्तर
हो, पण वेळेचं गणित जमवायला हवं!

प्रश्न २२
या व्यवसायात प्रामुख्याने कोणत्या अडचणी येतात?
हेमंत यांचं उत्तर
साधारण वर्ष/दोन वर्ष काहीही उत्पन्न आले तरी टिकून राहण्याची मानसिकता. व त्या गरजेइतकं आर्थिक पाठबळ. अमराठी व्यावसायिकांचे हे सूत्र आहे.

प्रश्न २३
व्यवसाय जेंव्हा सुरू करता तेंव्हा कोणत्या विशिष्ट बाबींची काळजी घ्यावी? किंवा कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तुम्ही कोणाचं सहकार्य घेतलं होतं?
हेमंत यांचं उत्तर
सर्वात महत्वाचं मार्केट. म्हणजे मार्केटची वर्तमान परिस्थिती काय आहे. आपण जो व्यवसाय करणार त्यासाठी लागणारा माल व कुठे किती पैशात विकला जाऊ शकतो याच गणित जमवण. अहंकार टाळावा. शिकता येईल तितकं शिकावं

प्रश्न २४
जेंव्हा हा व्यवसाय स्थिरतेकडे जाईल तेंव्हा काय करणं अपेक्षित आहे? काही टिप्स?
हेमंत यांचं उत्तर
माझाही व्यवसाय नवीन आहे. त्यामुळे अशा काळाचा अनुभव नाही. परंतु माझ्यामते एका व्यवसायावर व्यावसायिकाने अवलंबून राहू नये. जेणेकरून भविष्यकाळात व्यवसाय अडचणीत आला तर इतर व्यवसायातून उभारी घेता येईल!

प्रश्न २५
व्यवसाय सुरू करताना याची नोंद कुठे करावी लागते का? किंवा काही परवाने घ्यावे लागतात का?
हेमंत यांचं उत्तर
सुरवातीला लागायची. किमान शॉप ऍक्ट घ्यावा लागायचा. जर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करायची असल्यास निकष बदलतात. परंतु सामान्य व्यवसायास कुठल्याही नोंदीची गरज नाही.

याला जोडून प्रश्न विचारतो, कंपनी प्रायवेट लिमिटेड करताना त्याची नोंद कुठे करत असतात याबद्दल सांगू शकाल?
उत्तर
त्यातही अनेक प्रकार असतात एलएलपी वगैरे. मलाही माहिती घ्यावी लागेल!

प्रश्न २६
GST चा या व्यवसायावर काही परिणाम? GST भरण्याची प्रक्रिया किंवा कर, परवाने या सरकारी बाबी त्रासदायक आहेत का?
हेमंत यांचं उत्तर
दहा लाखाच्यावरील व्यावसायिकांना ते आवश्यक आहे. मी अजून छोटा व्यावसायिक आहे. परंतु त्रासदायक नसावे कारण गरज सरकारला आहे!

हे सकारात्मक आहे!
प्रश्न २७
येणार्‍या काळात या क्षेत्रात कितपत वाव आहे असं आपल्याला वाटतं? या क्षेत्रात सध्या किंवा भविष्यातील आव्हाने काय असतील?
हेमंत यांचं उत्तर
खूप वाव आहे. भारतात सध्याला वेब आणि मोबाईल अँपसाठी प्रचंड वाव आहे. जितकं कराल तितकी संधी!

प्रश्न २८
स्त्रीला तिचं वय अन पुरुषाला त्याचा पगार विचारू नये असं म्हणतात, पण तुम्हाला या व्यवसायातून वार्षिक उत्पन्न किती मिळतं?
हेमंत यांचं उत्तर
फार नाही येत साधारण महिन्याकाठी २०-२५ हजारांचा पल्ला गाठतो!

प्रश्न २९
शेवटचा प्रश्न. नोकरी सोडून हा व्यवसाय सुरू केलात, समाधानी आहात की निर्णय चुकला असं वाटतं?
हेमंत यांचं उत्तर
अगदी सांगायचं झालं तर घरी आल्यावर कधी डोकं दुखत नाही. आणि आवडीचे क्षेत्र असल्याने कामाचं ओझं वाटत नाही! सर्वात मोठा संघर्षाचा काळ जरी असला तरी तितकाच सुखाचा काळ देखील आहे!

खूप खूप धन्यवाद हेमंत! आमच्या उपक्रमात तुम्ही पहिले पाहुणे म्हणून सहभागी झालात यासाठी धन्यवाद! आपल्या व्यवसायात वाढ व्हावी अन आपण उत्तरोत्तर प्रगती साधत राहाल यासाठी शुभेच्छा!!! #उद्योजकमहाराष्ट्र

महाराष्ट्र उद्योजक मंडळ ट्विटर हँडल  -  @mh_udyog  
Admin
अभिषेक बुचके  ||   ट्वीटर - @Late_Night1991   ||  latenightedition.in

शुभम बानुबाकोडे (अमरावती) || Twitter - @shubham_pb  ||  shubhambanubakode.wordpress.com

अंकित देशमुख (परभणी/चेन्नई)  ||  Twitter - @ankith_official

No comments:

Post a Comment

#उद्योजकमहाराष्ट्र - शेअर मार्केट

महाराष्ट्र उद्योजक मंडळ  ||  मराठी उद्योजक  ||  share market business शेअर बाजारातील व्यवसाय नमस्कार महाराष्ट्र! # उद्योजकमह...